ग्रामपंचायत | Grampanchyat

 

ग्रामपंचायत | Grampanchyat

*  ग्रामपंचायत

प्रत्येक गावाचा कारभार ग्रामपंचायत करते. पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा दोन किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते. तिला 'गट ग्रामपंचायत' म्हणतात.

* ग्रामपंचायतीची कामे

१) पाणीपुरवठा करणे

२) दिवाबत्तीची सोय करणे

३) जन्म-मृत्यूची नोंद करणे

४) विवाहाच्या नोंदी करणे इत्यादी कामे ग्रामपंचायत करते.

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी

* सरपंच : ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता येतो. सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज उपसरपंच पाहतो.

ग्रामसेवक : ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव  असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे, ग्रामपंचायतीच्या विकास योजना गावातील लोकांना समजावून सांगणे इत्यादी कामे ग्रामसेवक करतो.

ग्रामसभाः

* ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वांत महत्त्वाचे संघटन होय.

* प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा सभा होणे बंधनकारक आहे. ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी सरपंचावर असते.

* प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते.

* ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळवल्या जातात. ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते.

• शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत ते ठरवण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो..

ग्रामसभेत महिलांचा सहभाग :

* ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते. तिथे महिला अधिक मोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करतात.

• पिण्याचे पाणी, दारूबंदी, रोजगार, इंधन, आरोग्य इत्यादी विषयांबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात.

• आवश्यक ते बदल घडवण्यासाठी उपायही सुचवतात.

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने : 

* गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आहे. विविध करांची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते.

१) घरपट्टी

२) पाणीपट्टी

३) आठवडे बाजारावरील कर

४) यात्रा कर

५) राज्यशासन  आणि जिल्हापरिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान

Post a Comment

0 Comments